२ लाख ७० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने विविध नवीन वस्त्यांमध्ये जलसुविधांची उभारणी करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चर्च परिसर, स्वागत नगर, सिद्दिकी नगर, फरीद नगर, न्यू भारत नगर आदी भागांसाठी उभारण्यात आलेल्या २ लक्ष ७० हजार लिटर क्षमतेच्या जलकुंभांचे लोकार्पण नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या हस्ते उत्साहात झाले.

तसेच यावेळी नगराध्यक्षांच्या हस्ते या भागात प्रत्यक्ष नळाद्वारे पाणीपुरवठ्यालाही सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक रईस पठाण, अकिल देशमुख, फहिम पठाण, शेख आजीम आदिंसह नगर परिषदेचे अधिकारी व या भागातील स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती. या लोकार्पण सोहळ्यावेळी बोलताना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले की, आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली सिल्लोड शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत.

 विशेषतः नव्याने विकसित होणाऱ्या वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. रमजान ईद, गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणीटंचाई दूर करून नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा मिळावा, हा आमचा मुख्य उद्देश असून त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. 
शहाच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असून भविष्यातही अशाच प्रकारच्या मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या उपक्रमामुळे संबंधित परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, पाणीपुरवठ्याची समस्या मिटल्याने या भागातील नागरिकांनी आमदार अब्दुल सत्तार तसेच नगरपरिषदेचे आभार मानले आहे.